Monday, March 26, 2007

मेरे घरका सीधासा इतना पता है!

घर बदलणं म्हणजे एक नवीन संसार उभा केल्यासारखंच.
आणि छोट्या घरातून मोठ्या घरात जाणं म्हणजे हौसेला उधाण. त्यातून नवर्‍याने सांगून ठेवलेलं. जे काही करायचं ते प्लॅन कर. sizes, colors सगळं कॉम्पवर नीट करून बघ. एक ppt तयार कर. डोक्यात नीट उतरल्याशिवाय प्रत्यक्षात नको.
हे एक बरं असतं. स्त्रियांची सौंदर्यदृष्टी पुरुषापेक्षा चांगली असते म्हणे. आणि घर उभारणे हा तर अनादीअनंतापासून स्त्रीचाच हट्ट. पुरुषाला काय कुठेतरी पथारी पसरली की झालं.किती सोयिस्कर ना. आणि मग सोफ्यावर रेलून तंगड्या टिपॉयवर पसरून हातात रिमोट घेऊन बातम्या, करंट मार्केटची विश्लेषणं आणि मॅचेस काय गुहेत बघणार होता का हा पुरुष?
तर अशा प्रकारे सगळे निर्णय माझ्यावर सोपवून स्वतः फक्त सूचना (वजा टीका) करायला साहेब तयार. खरंतर मलाच ओढवून घ्यायची हौस. नको नको interior designer कशाला मी आहे ना. आपल्याला काही मुव्ही किंवा सिरियल मधल्यासारखं घर नकोय. आणि कायम थोडंच मुंबईत रहाणारोत आपण?
मग काय पैसे वाचल्याची खुषी लपवत तो तयार झाला पण ही अशी आटींची माळ लावून.
रोज मी त्याला दाखवतेय
" हे बघ हा रंग हॉलला. हा मास्टर बेडला. या भिंतीला हा असा वेगळा देऊ. "
" अगं ए बाई डार्क ऑरेंज. बरी आहेस ना. "
" असला *** पिवळा पॅसेजला? "
फ़र्निचर लागेल तितकंच नवीन घेऊ. आहे ते वापरूच असं ठरलं होतं बरंका आधी. पण परवडणार्‍या मॉड्युलर किचन्स च्या शोधात वणवणत असताना पाहिलेला बेडरूम सेट माझ्या आर्जवांना मुळीच फ़ूटेज न देता बुक करून टाकला. आणि मॉड्युलर किचन (मॉ. की.) राहिलंच. एका हुषार फ़र्निचर वाल्याकडून मग ते बनवून घेतलं हवं तसं.
आता ही मॉकी ची आयडीया पण त्याचीच. एकदा स्लीक किचन नावाच्या दुकानात गेलो. तर २.५० लाखाच्या खाली बात नाही.आणि हा मात्र " सही आहे हेच घेऊ " . तो असा एखाद्या गोष्टीने इम्प्रेस झाला की संपलं. आता तर मी अगदी हातघाईला आले. "अरे आपल्याला काय करायचाय तो हॉब? एक एग्झॉस्ट लावला की काम फ़त्ते. वारं पाहिलंस ना कसं उधाण शिरतं घरात. आणि ह्या इतक्या ट्रॉल्या काय करायच्यात? दोघांचं सैपाकघर. त्यात रोज ४० जणांचा पुरणाचा सैपाक करायचा असल्यासारखी जय्यत अरेंजमेंट कशाला?"
अशा वेळी हे दुकानदार पण जो कुणी वस्तू विकत घेण्याच्या मूडमधे असेल त्याला असा मस्का लावतात. आणि आमचे हे तर त्याच ग्रूपमधे सामील होऊन एक डेलेगेशनच मला समजवायला लागते. आत्ताही तो टायवाला " मॅम डोंट वरी विल कम न चेक व्हॉट सूट्स युवर प्लेस. वी कॅन स्किप द हॉब इफ़ यू वॉंट " वगैरे बोलायला लागला. कार्ड देऊन आणि ऍड्रेस लिहून बाहेर पडल्यावर या इतक्या पैशात अख्खं घर रिनोवेट होईल हे मी नवर्‍याला ठसून सांगितलं.
आमच्या दोघांचं एकमत मला वाटतं एका बुककेस वरच झालं. डायनिंग टेबल बघायला गेलो होतो तेंव्हा ही बुक केस जाम आवडली दोघांनाही. ती आमच्या इतर फ़र्निचरला सूट होईल अशा रुपात घरात आलीही. (ते डायनिंग टेबल तेवढं राहिलंच आहे अजून घ्यायचं.)
एकदा पडदे बघायला गेलो तर अख्ख्या महाराष्ट्राची लाईट गेलेली. दुसरीकडे त्याला इतके आवडले की
" अरे फ़ार नाज़ुक आहेत. आपल्याला टिकाऊ पाहिजेत. जरा बघून येऊ. " हे अर्थातच कानाआड टाकत खरेदी झालीच. पहिल्याच दिवशी त्यातला एक जरासा फिसकलाय. पण खरेदीच्या वेळचा नवर्‍याचा उत्साह काही बदलून आणायचं किंवा परत करायचं म्हटलं की पूर्ण वितळलेला असतो.
अनेक ऐनवेळी उद्भवलेल्या गोष्टींना जागा करत, ठरवलेल्या अनेक गोष्टींना(म्हणजे हे झाल्याशिवाय जमणारच नाहीये रहायला या टायपातल्या) तसेच पेंडिंग ठेवत एकदाचे आम्ही तिकडे shift झालो.
मधेच खूप उकडतंय ना. पण खूप मोकळंही वाटतंय.
पवईचा तलाव दिसायचा ना पूर्वी तुकड्यात का होईना. पण इथे छोटी छोटी दोन तीन तळी दिसतायत. आणि हिरवंगार आहे समोर. त्यापलिकडे विमानतळ. त्याचे दिवे इतके विलोभनीय दिसतात. आणि मुंबईत साधारण दर दोन मिनिटाला एक विमान उतरते किंवा उडते तेही दिसतं.
हौसेनं लावलेलं "इसको लगा डाला तो लाईफ झिंगालाला " वालं केबल काहीतरी झोल झाल्यामुळं दोन तीन दिवस बंद आहे. पण इतकं काही जाणवत नाहीये टिव्हीचं नसणं.
रस्त्यावरच्या गाड्यांचा खूप उशीरापर्यंत आवाज येत रहातो ना. पण पहाटे पक्ष्यांच्या आवाजाने जाग येते भर मुंबईतच.
तो पडदा जरासा... ते काही माझ्या मनातून जात नाहीये. पण संध्याकाळची तिरपी उन्हं लॅव्हेंडर, फिकट निळा, मॅजेंटा अशा वेगवेगळ्या छटांमधे वेगवेगळ्या खोल्यात उतरायला लागतात.
रंगाचे फायनल पॅचिंग राहिलेय. म्युझीक सिस्टीम जुन्या घरातून इकडे आणलीच नाहीये. पाऊस पण मुसळधार पडतो म्हणे इथे. शिवाय Top floor म्हणजे लिफ्टवर अवलंबून रहाणं.
अशा आणि इतर बर्‍याच गोष्टींमधे आम्ही कन्फ्युज्ड आहोत.
पण...
सगळा दिवस आवरला की रात्री घरातले सगळे दिवे घालवून खिडकीच्या प्रशस्त एक्स्टेन्शनवर निवांत पाय पसरून समोर पसरलेले रात्रीचे लखलखते शहर, त्या सगळ्या दिव्यांवर मात करणारा चंद्र आणि पवईतल्या नष्ट होत चाललेल्या जंगलातल्या थोड्याबहुत उरलेल्या झाडीतून प्रवास करत आवेगाने घरात घुसणारा थंड वारा यापुढे बाकी सगळे फिके आहे.